समस्या ते संधी (शब्दांकन)

                                                                                                  समस्या ते संधी                                                                                                         लेखक: अग्नेलोराजेश अथायडे/ शब्दांकन: विनोद अनंत मेस्त्री

 आपल्या आयुष्यात बरेच प्रसंग घडत असतात. त्याचं वर्गीकरण आपण चांगले प्रसंग अणि वाईट प्रसंग असं करतो. ज्या प्रसंगांचे किंवा घटनेचे परिणाम आपल्याला हवे तसे घडत असतील तर ते चांगले प्रसंग आणि ज्यांचे परिणाम आपल्या मनाविरुद्ध किंवा मनाला न पटणारे होत असतील तर ते वाईट प्रसंग.

आपल्या आयुष्यात घडणाऱ्या घटना या ‘घटनाच’ असतात. त्यांचा अर्थ आपण काय लावतो यावर पुढील परिणाम अवलंबून असतात. आपल्या आयुष्यात घडणारी सगळ्या घटना चांगल्याच असतात किंबहुना चांगल्यासाठीच असतात. ‘समस्या ते संधी’ हे पुस्तक तुम्हाला प्रतिकूल परिस्थिती कश्या प्रकारे एक संधी आहे हे समजून घेण्यास मदत करते.

हे पुस्तक नामवंत उद्योजक अग्नेलोराजेश अथायडे यांच्या व्यावसायिक अनुभवांवर आधारित आहे. वसई मध्ये जन्म झालेल्या आणि मालाड मालवणी सारख्या कुप्रसिद्ध विभागात वाढलेल्या अग्नेलोराजेश यांनी प्रचंड मेहनतीने काही वर्षात एक उद्योगविश्व निर्माण केलं. वयाच्या अवघ्या ४०-४२ वर्षांत त्यांनी तंत्रज्ञान प्रशिक्षण, हॉटेल आणि आदरतिथ्य या क्षेत्रात यशाचा झेंडा रोवला आणि तमाम तरुण उद्योजकांचे ते प्रेरणास्थान बनले. त्यांचा हा शून्यातून विश्वनिर्मितीचा प्रवास, त्यांनी वापरलेल्या व्यावसायिक क्लुप्त्या, व्यावसायिक प्रगतीसाठी लागणारी गुण-कौशल्ये या पुस्तकातून मांडण्याचा त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे.

‘बीज अंकुरे अंकुरे’ या प्रकरणामध्ये प्रतिकूल परिस्थितीला चिटकून न राहता त्यातून बाहेर पडण्याची धडपड काय असते? या परिस्थितीला कमजोरी न समजता तिचा वापर ताकद म्हणून कसा करावा? मोठं स्वप्न का बाळगावं आणि ते तुमच्या जीवनात काय बदल आणू शकतं याची प्रचीती आपल्याला येईल.

‘मला देव सापडला’ हे प्रकरण आपल्या जीवनात येणाऱ्या व्यक्ती किती महत्त्वाच्या असतात? इतरांचा विश्वास आपण कसा जिंकू शकतो? माणसे जिंकण्यासाठी महत्त्वाची भांडवले कोणती? योगदानाची ताकद काय असते? या गोष्टी स्पष्ट करेल.

आपल्या जीवनात येणारा प्रत्येक कठीण प्रसंग हा चांगलाच असतो. तो प्रत्येक प्रसंग हा आपल्या जीवनात आलेली एक संधी असते.  काहीतरी नवं अनुभवण्याची संधी! जुन्याची कात टाकून नवं काहीतरी घडवण्याची संधी!! अभूतपूर्व असं काहीतरी शिकण्याची संधी!!! एक माणूस म्हणून विकसित होण्याची संधी!!!!  ‘समस्या ? छे ! ही तर संधी’  हे प्रकरण आपल्याला समस्यांना संधीत रुपांतरीत कसं करावं याचं मार्गदर्शन करेल.

‘नावात सर्वकाही आहे’ या प्रकरणामध्ये संस्थेच्या नावाचं महत्त्व, ते ठरवताना घ्यावयाची काळजी, संस्थेचा लोगो कसा असावा, त्याची रंगसंगती कोणत्या आधारे निवडावी? व्हिजिटिंग कार्ड, लेटरहेड बनवताना घ्यावयाची काळजी याचं अमूल्य मार्गदर्शन करेल.

‘खरं जग पाहायचंय? या चौकटीबाहेर!’ या प्रकरणात, मर्यादित विचारांची चौकट तोडून आपण करत असलेल्या प्रत्येक गोष्टीत यश कसं प्राप्त करू शकतो हे आपल्याला सांगेल. विचारांची चौकात तोडल्याशिवाय आपल्याला आणखी मोठ्या विश्वाचा अनुभव घेता येत नाही हे या प्रकरणातून सिद्ध होईल.

उद्योगात टिकण्यासाठी आणि प्रगती साधण्यासाठी विस्तारणं किती महत्त्वाचं असतं? अल्पशा यशावर समाधान न मानता, मोठं घडवण्याची हिंमत आपण बाळगायला हवी. उद्योग वाढवण्यासाठी आपली ‘विस्तारनीती’ काय असायला हवी हे आपल्याला ‘वाढवल्याने वाढे उद्योगं’ या प्रकरणात कळेल.

आपण जाहिरातींच्या जगात जगत आहोत. तुमची जाहिरात हे तुमच्या जिवंत असल्याचं लक्षण आहे. कमीत कमी खर्चांमध्ये अधिकाधिक प्रभावी जाहिरात आपण कशी करू शकतो? त्यात कल्पकतेचा वापर करून दीर्घकाळ टिकणारा प्रभाव आपण ग्राहकांच्या मनावर कसा सोडू शकतो हे ‘डबा वाजवता यायला हवा’ या प्रकरणात आपल्याला शिकायला मिळेल.

‘ग गुंतवणुकीचा’ हे प्रकरण व्यवसायातील योग्य गुंतवणूक, गुंतवणुकीचे विविध पर्याय आणि आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्याचे मार्ग आपल्याला देईल.

‘ब्रांडचा बाऊ’ हे प्रकरण आपल्याला ब्रांडचे महत्त्व पटवून देईल. ब्रांड कसा तयार करावा, टिकवावा आणि वाढवावा, त्यासाठी कोणत्या गोष्टींची पूर्तता करणं अत्यंत गरजेचं आहे,  हे आपल्याला या प्रकरणातून कळू शकेल.

कोणताही उद्योग यशस्वी होणं हे बऱ्याच अंशी त्या उद्योगाच्या संस्थापकावर अवलंबून असतं. कोणताही उद्योग टिकवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी उद्योजाकामध्ये काही नेतृत्वगुण असणं अत्यंत गरजेचं आहे. असे आठ उत्कृष्ट नेतृत्वगुण ‘हमारा नेता कैसा हो?’ या प्रकरणात मांडण्यात आले आहेत.

आपण माहिती तंत्रज्ञानाच्या युगात जगत आहोत. आज ज्याच्याकडे जितकी जास्त माहिती तो तितका श्रीमंत असं आजचं गणित आहे. चोहीकडून माहितीचा भडीमार होत असताना, आपल्या उद्योगाला पोषक अशी माहिती कशी मिळवावी आणि तिचा वापर व्यवसाय वृद्धीसाठी कसा करावा, हे आपल्याला ‘मेरे पास इंफॉर्मेशन हैI’ हे या प्रकरणात शिकायला मिळेल.

‘स्मार्टमन व्हा!’ हे प्रकरण उद्योगातील स्मार्टनेसवर भाष्य करेल. एक स्मार्ट उद्योजक म्हणून तेजी मंदीच्या काळात हुशारीनं वागण्यासाठी आवश्यक असलेल्या ५ कौशल्यांचा अनुभव आपल्याला या प्रकरणातून मिळेल.

एखादा वेगळा विचार तुमच्या व्यवसायाला वेगळ्या उंचीवर नेऊ शकतो. उद्योगात दीर्घकाळ टिकायचं असेल आणि स्पर्धेला सडेतोड उत्तर द्यायचं असेल तर नवनवीन कल्पना राबवणं अत्यंत गरजेचं असतं. आपण करत असलेल्या प्रत्येक गोष्टीत ‘थोडा हटके’ विचार करून आपण बाजारात आपलं वेगळेपण कसं सिद्ध करावं हे ‘विचार करा, जरा हटके’ या प्रकरणात शिकायला मिळेल.

‘बोलबच्चन’ हे प्रकरण आपल्याला उद्योगातील संभाषण कौशल्य विकसित कसे करावे याचं मार्गदर्शन करेल. आजच्या काळात व्यावसायिक प्रगती साधनं हे बऱ्याच अंशी तुमच्या संभाषण कौशल्यावर अवलंबून आहे. उत्कृष्ट संवाद साधण्यासाठी कोणत्या ९ गोष्टींची आवश्यकता आहे हे आपल्याला ‘बोलबच्चन’ या प्रकरणात शिकायला मिळेल.

स्पर्धा कुणालाही चुकली नाही आणि व्यवसायातील स्पर्धा तर अटळ आहे. स्पर्धेकडे निराशाजनक दृष्टीने न पाहता ती आपला विकास साधण्यासाठी कशी महत्त्वाची आहे आणि तिला सकारात्मक दृष्टीने घेऊन स्वतःचा विकास साधत आपण स्पर्धेत अव्वल कसे राहू शकतो याचं मार्गदर्शन ‘स्पर्धा कोणाशी?’ या प्रकरणात आपल्याला मिळेल.

आपल्या जीवनात एखादं लक्ष्य असणं आणि त्यावर लक्ष केंद्रित करून अद्वितीय यश खेचून आणणं कसं शक्य आहे हे आपल्याला ‘लक्ष्य, लक्ष्य आणि फक्त लक्ष्य’  या प्रकरणात अनुभवायला मिळेल.

या सर्व गोष्टींच्या अंती ‘केकवरील चेरी’ ठरेल ते शेवटचे प्रकरण ‘सामाजिक उद्योजकता’. व्यावसायिक प्रगती साधताना सामाजिक दृष्टिकोन कसा ठेवावा, आपल्या प्रगतीबरोबर समाजातील दुर्बळ घटकांची प्रगती कशी साधावी आणि स्वतःसोबत इतरांना पुढे नेत एक प्रबळ समाज कसा घडवावा याचं उत्कृष्ट विश्लेषण या प्रकरणात केलं आहे. ते वाचकाला अंतर्मुख करेल यात शंका नाही.

अग्नेलोराजेश अथायडे यांचा प्रवास सांगता सांगता अत्यावश्यक शिकवणींची पेरणी या पुस्तकात अत्यंत उत्कृष्टरित्या केली गेली आहे. हे पुस्तक वाचकांसाठी आणि आयुष्यात मोठं काहीतरी घडवण्याची इच्छा असणाऱ्या प्रत्येकासाठी एक जबरदस्त मेजवानी ठरेल.

या पुस्तकाचं शब्दांकन बेस्ट सेलिंग पुस्तक ‘मला शिवाजी व्हायचंय!’ पुस्तकाचे लेखक विनोद अनंत मेस्त्री यांनी केलं असून, ‘जीवनरंग प्रकाशना’ तर्फे हे प्रकाशित होत आहे.

Displaying book cover 11.jpg